मी कोण ?

 

माझे नाव नम्रता. साल २०१५ मध्ये मी विणकाम-GYAN स्थापन केले. माझी विणकामाची छोटीशी लहानपणीची  आवड, अमेरिकेत आल्यावर सवड मिळाल्यामुळे पुन्हा एकदा जोपासता आली. इथे फारच सुंदर आणि निरनिराळा लोकरी पहिल्या, अनेक सुया आणि क्रोशे हुक आणि त्याही पलीकडे जावून इथे विणकामाला असलेलं ग्लॅमर मला आवडलं.

पहिल्या वेळेस Walmart मध्ये गेले आणि हरवून गेले.  जुनी ओळख असलेली व्यक्ती दिसली की कसे आपण बोलत बसतो, मग कशाचे भान राहत नाही, तसेच काहीसे. आमचे हे , श्री. औंधकर , मला शोधत आले मागे परत. मला म्हणाले “घे तुला हवे ते”. व्वा! मला हेच तर हवे होते. डॉलर मध्ये खरेदीची मला अजून सवय नव्हती झाली. मनातल्या मनात डॉलरचे रूपायामध्ये मोजून घेतले, यांना म्हणाले, “नको आत्ता, लहानपणी आवडायचे आणि लग्न झाल्यावर एक स्वेटर विणला होता, फसला होता तो, शिवाय इथे महाग असावे हे.”

औंधकरांना चांगलीच कल्पना होती, अमेरिकेत आल्यापासून स्वयंपाक आणि घर या व्यतरिक्त फारसे मी काही करत नसल्याने वेळ खूप असायचा. आग्रहाने त्यांनी मला संपूर्ण सेट घेवून दिला. घरी आलो अन दुसर्‍याच दिवशी माझ्या मुलासाठी स्कार्फ विणला. क्रोशे तसे फार काही माहीत नव्हते. साखळी माहीत होती. क्रोशे शिकायचे होते आणि youtube हाताशी होते. मग काय काही दिवसात शिकले आणि एकामागे एक क्रोशे आणि दोन सुयांचे विणकाम करून यांना स्कार्फ, आम्हा सर्वांना beanie , माझ्या मुलाला स्वेटर, …झपाटल्या सारखे रात्री जागून विणकाम चालू असायचे.

Youtube ने मला खूप मदत केली. आता मी माझ्या मातृभाषे मध्ये विडियोशोधू लागले होते. एकही मराठी विडियो नव्हता. मराठी चॅनलच नाही तर मग आपण स्वतः चालू करावा, अनेक माझ्या सारख्या महिला असतील ज्यांना इंग्रजी येत असले तरी आपल्या भाषेत ऐकायची आणि शिकायची हौस असेलच की!

मराठीतला पहिला विणकाम शिकविणारा आणि त्याची माहिती देणारा   Youtube चॅनल सुरू केला.  विणकाम , The मराठी Knits And Purls या नावाने , ५ फेब्रुवारी २०१५  या  तारखेला.

वो दिन है और आज का दिन है , विडियो रेकॉर्ड करण्यापासून , एडिट करून अपलोड करणे या सर्वात मी खूप प्रयत्न करते आहे. खूप मोठा learning curve आहे, भरपूर struggle आहे.

माझे प्रयत्न चालू राहतील आणि एक दिवस नक्कीच सगळे सुरळीत होईल याची मला खात्री आहे. मधली काही वर्षे परत पुण्याला होते, तिथे चॅनल सुरू ठेवला पण विडियो सतत अपलोड करणे जमले नाही. आता परत आले आहे इथे, पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. वेबसाइट सुद्धा नव्याने तयार करते आहे.

माझ्या चॅनल च्या प्रेक्षकांचा आणि तुमच्या सारख्या वाचकांचा प्रतिसाद पाहून माझा उत्साह वाढतो. म्हणून हे सर्व आपल्या सर्वांचे आहे.

एक विशेष महत्वाचे , आता चॅनल चे नाव बदलले आहे ‘VINKAM-GYAN’ असे ठेवले आहे. यातले GYAN म्हणजे माझे कुटुंब आहे. माझ्या मुलीने हे नाव, आमच्या सगळ्यांचे इंग्रजी आद्याक्षर वापरुन  तयार केले आहे.

G – गायत्री  Y – योगेश  A – अथर्व N – नम्रता

माझ्या नवर्‍याचा पाठिंबा खूप आहे आणि मुलांना माझे कौतुक आहे. आपण कदाचित जगात भारी नसतोच, घरात भारी असलो की जगात भारी आहोत असे वाटते , हे मात्र खरं आहे, कारण आपलं घरच आपले जग असते.

ही होती माझ्या विणकामच्या प्रवासाची  थोडी ओळख.

मी गेली काही वर्षे ‘stay at home mother’ आहे अशी माझी ओळख सांगायचे. मजा पहा, आई घरातच असायला हवी हे घरात राहायला सुरू केले तेव्हा मलाही पचनी पडले नव्हते. पण गेल्या एक दोन वर्षात मुलांनी मला’ पटवून दिले आहे हे. म्हणून आता मी housewife, stay at home mother असे न म्हणता, गृहमंत्री या पदावर विराजमान आहे, अशी माझी ओळख नव्याने सांगते.

स्वतःला नव्याने ओळखत राहायला हवे. जीवनाच्या कुठल्या वळणावर स्वतः ची खरी ओळख पटेल ते सांगता येत नाही.  आणि स्वतःचा  स्व शोधण्याच्या या प्रवासलाच आपण जीवन म्हणतो ना!

सध्या इतकेच.

धन्यवाद.

चला विणू या!!