विणलेल्या वस्तूंची किम्मत कशी ठरवावी?

विणकाम ही एक कला आहे. मग कलेची किंमत कशी ठरवू ? येईल ठरवता ?

खरच कलेची किंमत करता येणे शक्य आहे का?  नाही, पैशांमध्ये तर नाहीच. कला कलाकाराला भरभरून देत असते. चित्रकाराने काढलेल्या चित्रामध्ये त्याची अनुभूती असते, त्याची किंमत ते चित्र विकताना कुठे बरं लिहिलेली असते? कलाकाराने केलेल्या निर्मितीमध्ये त्याची प्रतिभा दिसते, त्यानुसार त्याची किंमत ठरवली जाते. पण कलेचा खरा जाणकार असतो, त्याला नुसतीच कलाकाराची प्रतिभा दिसत नाही तर, तो  जाणकार त्या कलाकाराच्या  अनुभूतिमध्ये  समरूप होवून त्या अनुभूतिचा भाग होवू  पाहतो. म्हणूनच, हाताने बनवलेल्या वस्तूंची किंमत ठरवता येणे हे अतिशय अवघड आहे.

आता साधे हेच उदाहरण घ्या, हातमागाची  साडी असेल तर जास्त पैसे देऊन सुद्धा आपण ती घेतोच ना? पैठण मध्ये हातमागाची पैठणी घ्यायची असेल तर,  हौस आणि  रसिकता तर हवीच ; पण  त्या कलाकारांच्या प्रतिभेचा सन्मान म्हणून , उंची पैठणीची , उभी किंमत मोजण्याची दिलदारीही हवीच की!  असो, आपण मुद्द्यावर यायला खूप पालुपद मांडून झाले.

क्रोश्याचा मोदक कसा विणावा या आपल्या व्हीडिओच्या कमेन्ट मध्ये चैताली आंबेकर यांनी प्रश्न विचारला आहे :

Aapan tayar kelelya vastuchi kimmat kashi tharvaychi te sangu shakal ka? Mi crochet adult slippers banavlya aahet. How much should be the price of that slippers?

चैताली तुमचे खूप आभार प्रश्न विचारल्याबद्दल. मलाही हा प्रश्न कधी काळी पडला होता, त्याचे उत्तर मी शोधून काढले. मला जी माहिती मिळाली ती तर मी तुम्हाला सांगेनच, पण माझे अनुभव सांगण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. मा‍झ्या या  अनुभवांमधून मी जे शिकले त्याचा उपयोग तुम्हास  नक्कीच होईल.

असे पहा, कोणत्याही वस्तूची किंमत ही सर्व साधारणपणे खालील काही मुद्द्यांवरून ढोबळ मानाने ठरविणे शक्य असते :

 • त्यासाठी लागणारा कच्चा माल. कच्च्या मालाची प्रत काय आहे? एक वस्तु बनविण्यासाठी किती कच्चा माल वापरला जातो.
 • वस्तू तयार करण्यासाठी लागणारा वेळ
 • वस्तूचा वापर कश्या प्रकारचा आहे, कुठे आहे आणि कोणासाठी वस्तू वापरली जाणार आहे.
 • वस्तू जिथे विकायची आहे, तिथे त्या वस्तूचा बाजार कसा आणि किती आहे.
 • वस्तू मध्ये काही विशेष आहे का ? ; नाविन्य आहे का?
 • वस्तू सर्व सामान्य दैनंदिन वापराची आहे की विशिष्ट वेळीच वापरलं जाते.
 • वस्तू बनविण्यासाठी किती कौशल्य खर्च केले आहे?
 • वस्तू तयार करण्यासाठी कामगार लागतात का, किती लागतात, त्यांना द्यावे लागणारे पगार किंवा मोबदला काय आहे?

हे सगळेच मुद्दे विणकाम करून तयार होणार्‍या प्रत्येक वस्तूला प्रत्येक वेळीच लागू होईल असे नाही. खूप जास्त अवघड आणि किचकट सांगते आहे मी असे वाटत असणार तुम्हाला या घडीला !!!!!

ही सर्व माहिती देणारा विडियो नक्की पहा. विडियोची लिंक : https://www.youtube.com/watch?v=a_8KbgP3Ibo

तसे मुळीच  नाही, फार सोपे करून सांगणार आहे, पण तत्पूर्वी या लेखात मा‍झ्या सर्व वाचकवर्गाचा विचार करून, मी खोलात जाऊन विषयाची मांडणी करू इच्छिते.

विणकाम करून केलेल्या वस्तूंची किंमत ठरविण्यासाठी :

 1. लोकरीची किंमत आणि इतर वस्तूंची (मणी, टिकल्या, सजावटीसाठी लागणारे कुठलेही सामान, उदा: सॉफ्ट टोय  बनवत असाल तर त्यासाठी लागणारे खोटे डोळे इ.) किंमत
 2. विण्यासाठी लागणारा वेळ : मी एक टोपी एका तासात विणून पूर्ण करत असेन तर, त्या माझ्या एकातासाचे पैसे मी किती घ्यावे हे आधी ठरवायला हवे. एखादे मोठे ब्लंकेट मी विणत असेन तर त्यासाठी मला काही दिवस लागणार आहेत , अश्या वेळेस मी नोंद करून ठेवायला हवे की मी दिवसातून साधारण किती तास विणले. याप्रमाणे तासाचे पैसे ठरवणे काहीसे अवघड असू शकते, मी खूप भरभर विणेन तर दुसरी कोणी कमी वेगाने देखील विणत असेल, मग वेळ हे प्रमाण दोघींना सारखेच ठरत नाही. तासाचा दर ठरवताना याचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला फार काम लेखू नये की इतरांपेक्षा खूप जसता किंमत लावली तर आपली वस्तू विकली जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे.
 3. तुम्ही जे विणत आहात त्याची डिजाइन :  साधी विण असेल तर भरभर विणून होते, आणि एखादी विण नाजुक आणि किचकट असू शकते, जी विणायला फार वेळ लागतो. काही डिझाईन हाताखालच्या असतात आणि सवयीने पटकन विणून होते. एका तासाचाची किंमत ठरवताना याकडे नेटाने लक्ष द्यावे आणि त्याप्रमाणे वेळेची दोन करून, प्रत्येक डेजाइन प्रमाणे तासाचे पैसे वेगळे ठरवता येणे शक्य आहे.
 4. मार्केट:  ही माहिती मात्र असायलाच हवी. मी एखादा स्वेटर विणते, पण असाच स्वेटर बाजारात उपलब्ध आहे का, तो हाताने विणून कोणी विकत असेल तर तची किंमत काय आहे, कुठल्या प्रकारची लोकर त्यात वापरली आहे? अश्या अनेक गोष्टी आपलायला माहीत असायला हव्यात.
 5. सुया, हुक , मारकर्स इ साहित्याची खरेदी एकदाच होते. हे भांडवल म्हणता येईल.
 6.  विक्री स्वत: करता आहात की बनवून इतर दुकानांमध्ये देणार आहात. 
 7. एखादी वस्तु विणायची आहे की एकसारख्या खूप वस्तु घाऊक बनवून द्यायच्या आहेत.

आता तुमच्यासाठी थोडे सोपे असे काही मी द्यायलाच हवे. खाली मी एक सोपं गणिती सूत्र  देते आहे त्याचा वापर करा आणि तुम्ही केलेल्या वस्तूची किंमत साधारण किती असायला हवी हे शोधा. मी जे देते आहे ते सर्वांसाठी सर्वठिकाणी थोडे फार बादल करून वापरता येणे शक्य आहे. सर्वसमावेशक पण ढोबळ आहे.  देश, तिथले हवामान, गरज, लोकांची आवड, तुमच्या विण्याची सुबकता, विणलेल्या वस्तूची डिझाइन आणि इतर अनेक गोष्टींवर वस्तूची किंमत ही कमी जास्त होवू शकते.

सूत्र खाली दिल्या प्रमाणे :

 1. अ = लोकर आणि इतर साहित्याची किंमत * 3
 2. ब = लोकर आणि इतर साहित्याची किंमत + ( एका तासाची किंमत रुपये 80 * एकूण तास )
 3. वस्तूची किंमत = (अ + ब ) / 2

उदाहरण पाहू या :

उदाहरण क्रमांक 1 )

मी एक स्वेटर विणला, त्यासाठी लोकर वापरली = 400 GM , किंमत रुपये 360 फक्त, बटण 6 किंमत रुपये 50 फक्त. किमतीचे स्टिकर आणि स्वेटर धुण्याविषयी आणि लोकरीची माहितीचे स्टिकर 5 इ.  रुपये फक्त. एकूण : 360 + 50 + 5 = 415. स्वेटर विणायला मला 5 दिवस लागले, रोज साधारण 3 तास विणकाम केले. कधीकधी  सलग न बसता गप्पा मारत 4 ते 5 तास विणकाम सुरू होते, पण सर्वसाधारण रोजचे पूर्ण 3 तास काम केले.  5 दिवसाचे रोजचे 3 तास याप्रमाणे एकूण 15 तास विणकाम झाले.

 1. अ =   415 * 3 =  रुपये 1245 फक्त
 2. ब = 415 + (80 * 15) = 415 + 1200  =  रुपये 1615 फक्त
 3. स्वेटरची किंमत = ( अ + ब ) / 2 = (1245 + 1615 ) / 2 = रुपये 1430 फक्त.

उदाहरण क्रमांक 2 )

क्रोश्याची एक टोपी मी 40 gm लोकर वापरून 1 तासात पूर्ण केली. शोभेसाठी एक मोठे बटण वापरले. टोपीसाठी विशिष्ट रंग हवा असल्याने 60 gm नवी लोकर रुपये 50 ला विकत घ्यावी लागली. 40 gm टोपीसाठी वापरल्याने 20 gm लोकर  शिल्लक राहिली.

 1. अ = 50 * 3 = रुपये 150 फक्त.
 2. ब = 50 + (80*1) = रुपये 130 फक्त.
 3. टोपीची किंमत = (150 + 130) / 2 = रुपये 140 फक्त.

या उदाहरणात एक गोष्ट लक्षात येते. 20 ग्रॅम लोकर वापरली नाही तरी संपूर्ण 60 ग्रॅमचे पैसे टोपीची किंमत काढताना लावले. खास ती टोपी करण्यासाठी लोकर बाजारातून आणली असल्याने व 20 ग्रॅम ही फार कमी लोकर आहे त्याचा वापर फक्त एखादं फूल किंवा पान विण्यासाठी होवू शकतो. अशावेळी लोकरीची संपूर्ण किंमत हिशोबात मांडायला हरकत नसावी. नेहमी ऑर्डर देणारं ग्राहक असेल तर तिला मी , काही टक्के सूट देवू शकते. किंवा हे ग्राहक बोलकं असेल तर तिला सूट दिल्याने ती आणिक चारजणींना सांगून मला जास्त ऑर्डर मिळवून देणार असेल तर माझ्यासाठी तिला सूट देणे  सोयीचेच आहे.

माझी खात्री आहे, इथे दिलेले हे सूत्र आपल्या सगळ्यांना उपयोगी ठरेल.

विणकामाच्या व्यवसायाबद्दल पुढे नक्कीच बोलू या. सध्या इथे थांबते.

चला विणू या !

 

 

2 thoughts on “विणलेल्या वस्तूंची किम्मत कशी ठरवावी?”

 1. फारच छान आणि तपशीलवार स्पष्टीकरण. मलाही समजत नव्हते की आपण बनवलेल्या वस्तूंची किंमत कशी ठरवावी. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.
  मी छंद म्हणून विणकामाला सुरुवात केली. पण आता व्यवसाय म्हणून मला विणकाम करायचे आहे. त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे

  1. धन्यवाद. आपण कुठे राहता? इत्यादि माहिती मला learn.vinkam@gmail.com या माझ्या ईमेल वर पाठवा. मी नक्की संपूर्ण माहिती देईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *